लाटेक्-बीजाची रचना
ह्या प्रकरणात लाटेक्-बीजाची रचना कशी केली जाते व त्यातील विशेष चिन्हांचा वापर कसा केला जातो ह्याची माहिती आपण पाहणार आहोत. तसेच बीजधारिकेतून फलित कसे प्राप्त करावे हेदेखील पाहणार आहोत.
आपली पहिली लाटेक् धारिका अतिशय सोपी असणार आहे. हिच्यामागे कल्पना अशी आहे की लाटेक् धारिका कशी असते व ती कशी चालवली जाते ह्याचे प्रात्यक्षिक तुम्हाला दाखवणे. ह्या संकेतस्थळावरील उदाहरणे कशी चालवावीत हे जाणण्यासाठी मदत-पृष्ठाला जरूर भेट द्या.
जर संगणकावरील टेक्-वितरण वापरत असाल, तर तुमच्या संपादकामध्ये नवी धारिका उघडा, .tex
ह्या प्रत्ययासह धारिकेस कोणतेही नाव द्या. तात्पुरते प्रथम.tex
हे नाव आपण वापरू. त्यानंतर खालील मजकुराची नक्कल जशीच्या तशी तिथे टाका अथवा स्वतः हा मजकूर टंकलिखित करा. महाजालावरच लाटेक् वापरायचे असेल, तर ‘लाटेक् ऑनलाईन’ अथवा ‘ओव्हरलीफमध्ये उघडा’ ह्यांपैकी कोणतीही एक कळ दाबा.
संगणकावर लाटेक् बसवले असेल, तरीही ऑनलाईन लाटेक् वापरून पाहण्याची शिफारस आम्ही करू, ह्याचे कारण सर्व अद्ययावत् आज्ञासंच एकत्र कसे काम करतात हे पाहण्याची ही चांगली संधी आहे.
\documentclass{article}
\begin{document}
Hey world!
This is a first document.
\end{document}
ही धारिका जतन करून एखाद्या चालकासह चालवा, त्यामुळे एक पीडीएफ् फलित तयार होईल. तुमच्या संगणकावरील टेक्-वितरणासह धारिका चालवत असाल, तर त्याकरिता संपादकात असणारी कळ बदलत जाईल. फलित धारिकेत आपण वर लिहिलेला मजकूर आणि पृष्ठक्रमांक आपोआप येईल. लाटेक् हा क्रमांक आपोआप देते.
तयार झालेले पीडीएफ् फलित तुमच्या पसंतीच्या पीडीएफ् दर्शकासह उघडून पाहा. अभिनंदन! तुमची पहिली लाटेक् धारिका यशस्वीरित्या चालली आहे.
अडचणी कशा हाताळाव्यात?
लाटेक् चालवताना अडचणी येण्याची शक्यता असते. तुमच्या बीजधारिकेतील मजकूर वर दिल्याप्रमाणेच लिहिला गेला आहे ह्याची खात्री करून घ्या. कधी कधी अतिशय लहानसहान चुकांमुळे फलितामध्ये खूप मोठे बदल घडून येतात. काही वेळा चुकांमुळे बीजधारिका चालू न शकण्याइतपत गंभीर परिणाम होऊ शकतात. जर बीजधारिका चालत नसेल, तर तिच्यातील संपूर्ण आज्ञावली खोडून पुन्हा एकदा वर दिलेला मजकूर तिथे जसाच्या तसा प्रविष्ट करा व चालवून पाहा.
आज्ञापटलावर लाटेक् चालवताना जर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले, तर x
व <Enter>
ही कळ दाबल्यास तुम्ही प्रक्रियेतून बाहेर पडाल.
लाटेक् अडचण दाखवताना काही संदेश देते. ते अनेकदा माहितीपूर्ण असतात, परंतु ते इतर मजकूर संपादकांप्रमाणे कार्य करत नाहीत. काही संपादक अडचणींमधील निरोप अंशतः लपवतात. लाटेक्-मार्फत धारिका चालवली गेल्यानंतर एका .log
धारिकेची निर्मिती होते. .log
प्रत्ययाची धारिका ही साधी पाठ्यरूपी धारिका असते. ह्या धारिकेत अडचणींचा संपूर्ण निरोप वाचता येतो. अनेकदा अडचण सोडवताना सहलाटेक्-वापरकर्त्यांकडून .log
धारिकेची मागणी केली जाते.
अडचणी कशा हाताळाव्यात ह्याविषयी सविस्तर चर्चा प्रकरण १५मध्ये करण्यात आली आहे.
फलितात काय दिसत आहे?
तुमची पहिली लाटेक्-धारिका पायाभूत आहे. लाटेक्-धारिकांमध्ये मजकूर व आज्ञावली ह्यांचे मिश्रण असते. प्रत्येक आज्ञेची सुरुवात \
ह्या चिन्हाने होते. काही वेळा आज्ञांना कार्यघटक असतात जे महिरपी कंसात लिहिले जातात. काही वेळा आज्ञांना वैकल्पिक कार्यघटक असतात जे चौकटी कंसात लिहिले जातात. अशा बीजधारिकेस चालवल्यानंतर तुम्हाला पीडीएफ् फलित मिळते.
प्रत्येक लाटेक्-बीजधारिकेत एक (व एकच) \begin{document}
ही आज्ञा असते, तिची जोडी \end{document}
ह्या आज्ञेशी लावली जाते. ह्या दोन आज्ञांमध्ये दस्तऐवजातील मुख्य मजकूर लिहिला जातो. ह्या दस्तऐवजात दोन परिच्छेद आहेत. लाटेक्-मध्ये परिच्छेद एका रिकाम्या ओळीने तयार केला जातो. \begin{document}
च्या पूर्वी आज्ञापीठ असते. आज्ञापीठात फलित धारिकेची रचना कशी असावी ह्याची माहिती देणाऱ्या आज्ञा लिहिल्या असतात. \usepackage
ही आज्ञा आज्ञापीठातच लिहावयाची असते. ह्या आज्ञेसह आज्ञासंच निवडले जातात. ह्या आज्ञेविषयी अधिक माहिती प्रकरण ६मध्ये आली आहे. ह्या संकेतस्थळावरील अनेक उदाहरणांमध्ये ही आज्ञा वापरली गेली आहे.
लाटेक्-मधील \begin{...}
व \end{...}
ह्यांच्या जोड्यांना क्षेत्र म्हटले जाते. प्रत्येक \begin{अआइ}
ह्या आज्ञेकरिता \end{अआइ}
अशी आज्ञा असायलाच हवी. जर एका क्षेत्राच्या पोटात आणखी एक क्षेत्र असले (उदा. अआइ क्षेत्राच्या पोटात कखग क्षेत्र), तर
\begin{अआइ}
...
\begin{कखग}
...
\end{कखग}
...
\end{अआइ}
असाच क्रम असायला हवा. पोटातील क्षेत्र संपल्याशिवाय मुख्य क्षेत्र संपवता येणार नाही.
लाटेक् बीजधारिकांमध्ये %
ह्या चिन्हानंतर टिप्पण्या लिहिता येतात. ह्याचे एक उदाहरण पाहूयात.
\documentclass[a4paper,12pt]{article} % प्राचलांसह वापरला गेलेला लाटेक्-वर्ग
% आज्ञापीठात एक टिप्पणी
\begin{document}
% ही एक टिप्पणी आहे.
This is a simple
document\footnote{with a footnote}.
This is a new paragraph.
\end{document}
वरील उदाहरणातील टिप्पण्या फलितधारिकेत दिसत नाहीत. बीजधारिकेत एकाहून अधिक मोकळ्या जागा असल्या तरी फलितात एकच मोकळी जागा सुटते. परिच्छेदनिर्मितीसाठी एक रिकामी ओळ सोडण्यात आली आहे.
काही वेळा अशा मोकळ्या जागा द्याव्या लागतात ज्या ओळ संपल्यावर तुटत नाहीत. त्या कायम एकाच ओळीत दिसाव्या लागतात. (उदा. आद्याक्षरांसह नावे लिहिताना.) लाटेक्-मध्ये ही मोकळी जागा ~
ह्या चिन्हासह मिळवली जाते. दस्तऐवजातील अंतर्गत संदर्भ देताना ह्याचा विशेष वापर होतो.
विशेष चिन्हे
कदाचित तुम्हाला लक्षात आलेच असेल की \
, {
व }
ह्या चिन्हांना लाटेक्-मध्ये विशेष कार्य आहे. \
ह्या चिन्हाने लाटेक् आज्ञा सुरू होतात. महिरपी कंसांत ({
, }
) अनिवार्य कार्यघटक लिहिले जातात. अनिवार्य कार्यघटक म्हणजे अशी माहिती जी दिल्याशिवाय आज्ञांचे कार्य पूर्ण होऊ शकत नाही.
अशी काही चिन्हे आहेत ज्यांना विशेष कार्याकरिता निवडले गेले आहे. ही चिन्हे मजकूरात फार कमी आढळतात. वर पाहिल्याप्रमाणे ~
ह्या चिन्हाला सक्तीची मोकळी जागा सोडण्याचं कार्य आहे. जर ही चिन्हे मजकुरात वापरण्याची गरज असेल, तर अधिक माहिती ह्या पानावरील सूचना वाचा.
स्वाध्याय
लाटेक् ऑनलाईन आज्ञावली अधिकाधिक वापरून पाहा. एकदा चालवलेल्या धारिकेत किमान बदल करून धारिका पुन्हा चालवून पाहा.
तुमच्या पहिल्या दस्तऐवजात मजकुराची भर घालून पाहा. ती धारिका चालवून पीडीएफ् फलित योग्य दिसते का ते पाहा. वेगळे परिच्छेद व मोकळ्या जागा सोडून पाहा. तुमचा लाटेक् संपादक कसे काम करतो ते शिकून घ्या. बीजधारिकेतील एखाद्या मजकूरावरून फलितातील त्याच ओळीकडे कसे जावे हे शोधून पाहा. काही सक्तीच्या मोकळ्या जागांचा वापर करून, ओळतोडीवर त्याचा काय परिणाम होतो हे पाहा.