लाटेक् ह्या शब्दात वास्तविक दोन घटक आहेत ला व टेक्. पुढील विवेचनात आपण हे घटक कुठून आले ते पाहणार आहोत.
टेक् ही आज्ञावली मूलतः स्टॅनफर्ड विद्यापीठातील प्राध्यापक डॉनल्ड कनूथ ह्यांनी प्रकाशित केली. कनूथ हे त्यांच्या “द आर्ट ऑफ़् प्रोग्रॅमिंग” ह्या ग्रंथमालिकेकरिता प्रसिद्ध आहेत. १९७३ साली पुस्तकांची नवीन आवृत्ती तयार करायची होती. ह्या काळात अक्षरजुळणीच्या क्षेत्रात छायाचित्राधारित अक्षरजुळणीची सुरुवात होती. कनूथ ह्यांना ती नवी पद्धत आवडली नाही, म्हणून त्यांनी स्वतःची आज्ञावली घडवली.
१९७७च्या मेमध्ये टेक्-ची घडण होण्यास सुरुवात झाली.
टेक् ही मूळ आज्ञावली किंचित किचकट होती व त्यामुळे स्वतः कनूथदेखील त्यांच्या पुस्तकांच्या अक्षरजुळणीसाठी काही आज्ञा घडवून त्या वापरत असत. लेस्ली लॅम्पर्ट ह्यांनी टेक् आज्ञावलीवर आधारलेल्याच काही नव्या आज्ञांचा संच तयार केला ज्यामुळे टेक्-चा वापर सुलभ झाला. ह्या संचास त्यांनी लाटेक् हे नाव दिले.
हल्ली लाटेक् हा टेक् आज्ञावलीशी संवाद साधण्याचा सर्वात प्रचलित मार्ग आहे. ह्याला आणखी एक पर्याय कॉन्टेक्स्टचा आहे.