लाटेक्-ची तोंडओळख
ह्या प्रकरणात लाटेक् आज्ञावलीची तोंडओळख आपण करून घेणार आहोत. त्याकरिता मायक्रोसॉफ्ट वर्ड, लिब्रेऑफिस ह्यांसारख्या मजकूर-संपादकांत व लाटेक्-मध्ये काय भेद आहे हे आपण ह्या प्रकरणात पाहू.
मायक्रोसॉफ्ट वर्ड, लिब्रेऑफिस ह्यांसारख्या लोकप्रिय मजकूर-संपादकांपेक्षा लाटेक् वेगळे आहे. लाटेक्-सह “जे दिसेल ते मिळेल” ह्या स्वरूपाचे संपादन करता येत नाही. लाटेक्-च्या बीजधारिकेत साध्या मजकुराच्या आजूबाजूला अक्षरजुळणीच्या आज्ञा लिहिल्या जातात. ह्या आज्ञांचे अर्थ लाटेक् ह्या आज्ञावलीस परिचित असतात. त्यानुसार फलित धारिका तयार केली जाते. उदा. लेखातील विभाग तयार करण्यासाठी ज्याप्रमाणे एचटीएमएल आज्ञावलीत <h2>
हा घटक असतो, त्याप्रमाणे लाटेक्-मध्ये \section
ही आज्ञा असते.
लाटेक् कसे कार्य करते?
लाटेक् धारिकांमधील मजकूर वापरकर्त्यास अभिप्रेत असलेले दृश्यरूप दाखवत नाही. ह्या धारिकांमध्ये केवळ काही आज्ञावलिरूपी सूचना असतात. अशा बीजधारिकांवर लाटेक् ही आज्ञावली चालवली जाते (सर्वसाधारणतः लुआलाटेक्, झीलाटेक्, पीडीएफ्-लाटेक् अशा आज्ञांसह). त्यातून फलित म्हणून प्राप्त झालेली पीडीएफ् धारिका आपल्याला अभिप्रेत असलेले दृश्यरूप दाखवते.
बीजधारिका किती वेळा चालवावी?
साध्या लाटेक् बीजधारिकांना केवळ एकदा चालवणेही पुरे असते. त्यातून पूर्ण फलित तयार होते, परंतु जसजशी लाटेक्-ची अधिक प्रगत वैशिष्ट्ये तुम्ही वापरू लागता, तसतशा धारिका एकाहून अधिक वेळा चालवाव्या लागू शकतात. जेव्हा असे करण्याची आवश्यकता असेल, तेव्हा आम्ही तसे सूचित करू.
लाटेक्, पीडीएफ्-लाटेक् की …
पुढील प्रकरणात आपण हे पाहणार आहोत की लाटेक् ही एकल आज्ञावली नाही. तिच्यात निरनिराळ्या चालकांचा समावेश आहे. केवळ इंग्रजी मजकुराकरिता पीडीएफ्-लाटेक् नावाचा चालक पुरेसा आहे, परंतु वेगवेगळ्या कार्यांसाठी वेगवेगळे लाटेक् चालक वापरावे लागू शकतात. आपण त्यांबद्दल ह्या अभ्यासक्रमात करणार आहोत.