प्रकरण ११

अक्षरजुळणी: टंकांचे ठसे व ओळींमधील जागा

ओळींमधली जागा नियंत्रित करणे व अक्षरजुळणीविषयक विशिष्ट आज्ञा बीजधारिकेत समाविष्ट करणे हे ह्या प्रकरणात आपण शिकू.

आपण हे आधीच पाहिले आहे की एक मोकळी ओळ सोडल्यामुळे लाटेक्-मध्ये नवीन परिच्छेद तयार होतो. अशा प्रकारे परिच्छेद सुरू होताना ओळीच्या सुरुवातीस किंचित मोकळी जागा सुटते.

ओळींमधील मोकळी जागा

एक प्रचलित पद्धत अशी आहे की परिच्छेदांकरिता आडवी मोकळी जागा न सोडता एक संपूर्ण मोकळी ओळ सोडणे. हे करण्याकरिता parskip नावाचा आज्ञासंच वापरता येतो.

\documentclass{article}
\usepackage[T1]{fontenc}
\usepackage[parfill]{parskip}
\usepackage{lipsum} % Just for some filler text
\begin{document}
\lipsum
\end{document}

सक्तीची मोकळी ओळ सोडणे

बहुतांश वेळा लाटेक्-मध्ये सक्तीची मोकळी जागा सोडावी लागत नाही. बहुतेक वेळा परिच्छेद तयार करणे आवश्यक असते, त्याकरिता parskip ही आज्ञा पुरते.

काही ठिकाणी सक्तीने नवी ओळ सुरू करणे आवश्यक असते व तिथे परिच्छेद सुरू होणे नको असते. अशा काही जागा म्हणजे -

ह्या काही ठिकाणांव्यतिरिक्त अन्यत्र सक्तीने ओळ तोडण्यासाठी वापरण्यात येणारी \\ ही आज्ञा वापरणे अतिशय चुकीचे आहे.

ठरावीक मापाची मोकळी जागा सोडणे.

नियमित मोकळ्या जागेच्या अर्ध्या रुंदीची मोकळी जागा सोडण्यासाठी \, ही आज्ञा वापरता येते. गणितक्षेत्रात ह्याकरिता काही अतिरिक्त आज्ञादेखील आहेत. उदा. \., \:\;, तसेच ऋण मोकळ्या जागेसाठी \! ही आज्ञा वापरली जाते.

काही वेळा उदाहरणार्थ मुखपृष्ठ वगैरे तयार करताना विशिष्ट मापाची आडवी अथवा उभी जागा सोडण्याची गरज पडू शकते. त्यावेळी \hspace\vspace ह्या आज्ञा वापरता येतात.

\documentclass{article}
\usepackage[T1]{fontenc}
\begin{document}
Some text \hspace{1cm} more text.

\vspace{10cm}

Even more text.
\end{document}

टंकांचे ठसे व मांडणी

प्रकरण ३मध्ये आपण पाहिले की बहुतांश वेळा बीजधारिकेची तार्किक मांडणी करणे अधिक इष्ट असते, परंतु काही वेळा मजकुराला ठळक ठशात लिहिणे अथवा अक्षरे इटालीय वळणात लिहिणे अथवा तिरकी लिहिणे आवश्यक असू शकते. अशा मांडणीकरिता दोन प्रकारच्या आज्ञा लाटेक्-तर्फे पुरवल्या जातात. पहिली ठरावीक व लहान मजकुरासाठी व दुसरी बराच काळ चालणाऱ्या दीर्घ व धावत्या मजकुरासाठी.

लहान मजकुरासाठी \textbf, \textit, \textrm, \textsf, \texttt\textsc अशा कार्यघटकयुक्त आज्ञा वापरल्या जातात. ह्या आज्ञांच्या कार्यघटकातील मजकुराची मांडणी विशिष्ट प्रकारे केली जाते.

\documentclass{article}
\usepackage[T1]{fontenc}
\begin{document}
Let's have some font fun: \textbf{bold}, \textit{italic}, \textrm{roman},
\textsf{sans serif}, \texttt{monospaced} and \textsc{small caps}.
\end{document}

धावत्या मजकुराकरिता टंकाच्या ठशांच्या काही निराळ्या कार्यघटकहीन आज्ञा वापरता येतात. उदा. \bfseries अथवा \itshape. ह्या आज्ञा जोवर आपण त्यांना थांबवत नाही, तोवर थांबत नाहीत. त्यामुळे त्यांकरिता एक व्याप्ती तयार करणे आवश्यक असते. त्या व्याप्तीबाहेर त्यांचा ठसा वापरला जाऊ नये म्हणून. लाटेक्-मध्ये अशा काही व्याप्ती मूलतः असतातच. लाटेक् क्षेत्रे ही एक व्याप्ती आहे. कोष्टकांमधील चौकटीदेखील व्याप्ती आहेत. त्यांमध्ये वापरल्या गेलेल्या धावत्या मजकुरासाठीच्या आज्ञा त्यांच्याबाहेर लागू होत नाहीत. लाटेक्-मध्ये व्याप्ती तयार करणे फार सोपे आहे. त्याकरिता व्याप्तीमध्ये हवा असलेला मजकूर महिरपी कंसांत लिहावा लागतो. ({...})

\documentclass{article}
\usepackage[T1]{fontenc}
\begin{document}
Normal text.

{\itshape

This text is italic.

So it this: the effect is not limited to a paragraph.

}
\end{document}

अक्षरांचा आकारदेखील अशाच धावत्या आज्ञा वापरून ठरवता येेऊ शकतो. लाटेक्-मधील मूलभूत मजकुराच्या सापेक्ष असे काही आकार पुरवले जातात. लाटेक्-मधील मूलभूत अक्षरांच्या आकारास \normalsize ही आज्ञा आहे.

त्याहून मोठ्या आकारासाठी चढत्या क्रमात \large, \Large, \LARGE\huge हे आकार उपलब्ध आहेत.

त्याहून लहान आकारासाठी उतरत्या क्रमात \small, \footnotesize, \scriptsize, \tiny हे आकार उपलब्ध आहेत. आकार बदलण्यापूर्वी चालू परिच्छेद संपवणे आवश्यक आहे.

\documentclass{article}
\usepackage[T1]{fontenc}
\begin{document}
Normal text.

\begin{center}
{\itshape\large Some text\par}
Normal text
{\bfseries\small Much smaller text\par}
\end{center}

\end{document}

स्वाध्याय

अक्षरजुळणीच्या ह्या आज्ञांचा वापर करून पाहा. titlepage ह्या क्षेत्रासह आडवी व उभी मोकळी जागा सोडून मुखपृष्ठ तयार करा. निरनिराळे टंकांचे ठसे एकत्र कसे वापरावेत? गणितक्षेत्रात हे कसे काम करते?

एखाद्या मोठ्या परिच्छेदाचा आकार बदलला (उदा. \tiny अथवा \huge), परंतु त्याची व्याप्ती संपवण्यापूर्वी \par वापरून परिच्छेद संपवला नाही तर काय होते?