प्रकरण १३

दीर्घ दस्तऐवजांची रचना

ह्या प्रकरणात आपण दीर्घ लाटेेक्-बीजाचे लहान तुकड्यांत विभाजन कसे करावे हे शिकणार आहोत. त्यामुळे दीर्घ दस्तऐवज लिहिणे सुकर होते.

जेव्हा प्रदीर्घ आज्ञावली असणाऱ्या बीजधारिका लिहिल्या जातात, तेव्हा कदाचित त्यांचे विभाजन लहान धारिकांमध्ये करावेसे लेखकास/लेखिकेस वाटू शकते. उदा. एक मुख्य/मूळ बीजधारिका असणे व प्रतिप्रकरण वेगवेगळ्या धारिका तयार करणे ही एक रूढ पद्धत आहे. लेखामध्ये विभाग वेगवेगळ्या धारिकांमध्ये लिहिणे हेदेखील रूढ आहे. अशा वेळी मुख्य धारिकेत काय लिहावे हे आता आपण पाहू.

बीजधारिकांची मांडणी करणे

लाटेक्-मध्ये बीजाचे विभाजन करणे सहज शक्य आहे. ह्याकरिता दोन महत्त्वाच्या आज्ञा आहेत. त्या पुढीलप्रमाणे -

\input ह्या आज्ञेसह समाविष्ट केल्या जाणाऱ्या धारिकेतील आज्ञा जणू काही दस्तऐवजात \input आज्ञेऐवजीच लिहिला जात आहे अशा प्रकारे चालवल्या जातात. त्यामुळे ह्या प्रकारच्या आज्ञा कोणत्याही सामग्रीकरिता वापरल्या जाऊ शकतात. \include ही आज्ञा मात्र केवळ प्रकरणांकरिता वापरली जाते. ह्या आज्ञेसह एक नवीन पृष्ठ तयार होते. काही अंतर्गत गोष्टींची जुळवाजुळव केली जाते. ह्या आज्ञेचा एक फायदा असा की कोणत्या प्रकरणांचा समावेश आपल्याला फलितात हवा आहे हे एका विशिष्ट आज्ञेसह निश्चित करता येऊ शकते.

त्यामुळे दीर्घ बीजधारिकांची रचना पुढीलप्रमाणे करता येऊ शकते.

\documentclass{book}
\usepackage[T1]{fontenc}
\usepackage{biblatex}
\addbibresource{biblatex-examples.bib}

\title{A Sample Book}
\author{John Doe \and Joe Bloggs}

\IfFileExists{\jobname.run.xml}
{
\includeonly{
  front,
%  chap1,
  chap2,
%  append
  }
}
{
% पहिल्यांदा चालवताना सर्व साहाय्यक धारिका निर्माण होण्याकरिता सर्व धारिकांचा समावेश करणे.
}

\begin{document}
\frontmatter
\include{front}

% =========================
\mainmatter
\include{chap1}
\include{chap2}
\appendix
\include{append}

% ========================
\backmatter
\printbibliography
\newpage
\input{backcover}
\end{document}

आता आपण ह्या आज्ञावलीचे विविध तपशील खाली पाहूयात. ह्या मूळ धारिकेत समाविष्ट केलेल्या धारिकांची आज्ञावली ह्या पृष्ठाच्या शेवटी देण्यात आली आहे.

\input आज्ञा

\input ही आज्ञा दस्तऐवजातील प्रकरणे नसलेल्या, परंतु ज्यांची आज्ञावली दीर्घ आहे अशा भागांकरिता उपयुक्त आहे. आपल्या उदाहरणात मुखपृष्ठ व मलपृष्ठ ह्यांना वेगळे करण्यासाठी आपण ही आज्ञा वापरली आहे व त्यामुळे मुख्य बीजआज्ञावली छोटी व सोपी वाटते. तसेच ह्यामुळे सुट्या मुख व मलपृष्ठाच्या आज्ञावल्या दुसऱ्या धारिकांसोबत वापरणेही शक्य होते. प्रकरणे नसलेले काही विभाग आपण ह्या आज्ञेसह समाविष्ट करून घेतले आहेत उदा. प्रास्ताविक.

\include\includeonly ह्यांचा वापर

\include आज्ञा प्रकरणांकरिता उपयुक्त आहे, म्हणून आपण प्रत्येक पूर्ण प्रकरणासाठी तिचा वापर केला आहे. अपेक्षेप्रमाणे तिने नवीन पानापासून प्रत्येक समाविष्ट धारिकेतील आज्ञावलीची सुरुवात केली आहे. \includeonly ह्या आज्ञेसह कोणत्या धारिका खरोखरीच चालवायच्या आहेत ह्याची माहिती आपण लाटेक्-ला पुरवली आहे. ह्या आज्ञेच्या कार्यघटकात स्वल्पविरामांनी वेगळी केलेली धारिकांची नावे लिहिली जातात. \includeonly आज्ञेसह मूळ आज्ञावलीतील निवडक घटकांचाच समावेश करून लहान फलिते तयार करता येऊ शकतात व त्यांना मुद्रितशोधन अथवा संपादनासारख्या कामांकरिता पाठवल्या जाणाऱ्या खर्ड्यांसाठी वापरता येते. \includeonly आज्ञेचा सर्वात महत्त्वाचा फायदा असा की साहाय्यक धारिकांमध्ये नमूद करण्यात आलेले सर्व धारिकांतर्गत संदर्भ योग्यरीत्या छापले जातील.

अनुक्रमणिका तयार करणे

\tableofcontents ही आज्ञा विभागांसाठी वापरलेल्या आज्ञांद्वारे तयार झालेली माहिती वापरून अनुक्रमणिका तयार करते. .toc प्रत्ययासह ह्या आज्ञेची स्वतंत्र साहाय्यक धारिका तयार होते व त्यामुळे अनुक्रमणिका यशस्वीरीत्या दिसण्याकरिता लाटेक् दोनदा चालवणे आवश्यक ठरते. \listoffigures\listoftables ह्या दोन आज्ञांसह अनुक्रमे आकृत्या व कोष्टकांच्या याद्या छापता येतात. ह्या आज्ञांच्या अनुक्रमे .lof.lot नावाच्या साहाय्यक धारिका तयार होतात.

दस्तऐवजाचे तुकड्यांमध्ये विभाजन

\frontmatter, \mainmatter\backmatter ह्या आज्ञांमुळे दस्तऐवजाच्या रूपावर काही विशिष्ट परिणाम होतात. उदा. \frontmatter ह्या आज्ञेमुळे पृष्ठक्रमांकाच्या लेखनासाठी रोमी आकडे (i, ii, iii इत्यादी) वापरले जातात. \appendix ह्या आज्ञेमुळे प्रकरणांचे क्रमांक A, B, C इत्यादी वापरले जातात. उदा. \appendix आज्ञेनंतर आलेल्या पहिल्या प्रकरणातील शीर्षमजकूरात Appendix A असे म्हटले आहे. मराठी अक्षरजुळणीत मात्र ह्या गोष्टी चालू शकत नाहीत, त्यामुळे मराठी आज्ञासंचासह काही वेगळे नियम पुरवले जातात. आज्ञासंचाच्या बीजधारिकेतील ह्या विषयीच्या आज्ञा इथे पाहता येतील. तसेच पॉलिग्लॉसिया आज्ञासंचातील ह्या विशिष्ट कार्याकरिता असणाऱ्या मराठीविशिष्ट आज्ञा gloss-marathi.ldf धारिकेतील ह्या भागात पाहता येतील.

स्वाध्याय

उदाहरणात दिलेल्या धारिकेच्या रचनेत बदल करून पाहा. \includeonly ह्या आज्ञेच्या कार्यघटकातील धारिकांची नावे बदलून पाहा व होणारा परिणाम पाहा.

काही तरंगती दृश्यके समाविष्ट करा व कोष्टकसूची तसेच आकृत्यांची सूची निर्माण करण्याचा प्रयत्न करा. जर संगणकावर बसवलेले लाटेक् वापरत असाल, तर किती वेळा धारिका चालवावी लागते हे पाहा. (महाजालीय सेवांतर्फे आवश्यक वेळा लाटेक् आपसूक चालवले जाते व हे कार्य पडद्यामागे साधले जाते. त्यामुळे ते संगणकावरील लाटेक्-इतके उघड नाही.)


front.tex

\input{frontcover}
\maketitle
\input{dedication}
\input{copyright}
\tableofcontents
\input{pref}

pref.tex

\chapter{Preface}
The preface text. See \cite{doody}.

chap1.tex

\chapter{Introduction}
The first chapter text.

chap2.tex

\chapter{Something}
The second chapter text.

append.tex

\chapter*{Appendix}
The first appendix text.

frontcover.tex

\begin{center}
The front cover
\end{center}

dedication.tex

\begin{center}
\large
For \ldots
\end{center}

copyright.tex

\begin{center}
Copyright 2020 learnlatex.
\end{center}

backcover.tex

\begin{center}
The back cover
\end{center}